नाशकात ६ डिसेंबरपासून कृषी महोत्सव

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे आयोजन

नाशिक : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक यांच्यावतीने येत्या ६ ते १० डिसेंबर दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सव व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी ही माहिती दिली.

news on whatsapp 1 Taluka Post | Marathi News

कृषी विषयक तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ, संशोधन व विस्तार साखळी बळकट करणे, विपणन साखळीचे सक्षमीकरण करणे तसेच विक्री व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी प्रदर्शन, धान्य व खाद्य महोत्सव, परिसंवाद व चर्चासत्रे, खरेदीदार-विक्रेता संमेलन, आदींचा समावेश असणार आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेनुसार धान्य, फळे, भाजीपाला, सेंद्रीय शेतमाल, कडधान्य, प्रक्रियायुक्त पदार्थ रास्त दरामध्ये शेतकऱ्यांमार्फत ग्राहकांना थेट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत देण्यात येणार आहे. कृषी विषयक विविध विषयांवर परिसंवाद, व्याख्याने, चर्चासत्रे या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने तृणधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पौष्टिक तृणधान्य पिकांच्या प्रक्रियेवर आधारीत परिसंवादाचे आयोजन केले आहे. तसेच खरेदीदार-विक्रेता संमेलनाद्वारे विविध खासगी भागीदारीतून सुरू असलेले कृषी माल प्रक्रिया प्रकल्प, शेतकरी उत्पादन कंपनी, शेतकरी गट आणि निर्यातदार या सर्व घटकांना एका व्यासपीठावर आणून बाजाराभिमुख, मूल्यसाखळी, विकसित करून कृषी विस्तारास चालना दिली जाणार आहे.

शेतकऱ्यांना पुरस्कार देणार

अत्याधुनिक शेती औजारांचे प्रदर्शन व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची चव या महोत्सवाच्या माध्यमातून नाशिककरांना चाखता येणार आहे. यासाठी बचत गटांना दालनं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच जिल्ह्यातील कृषी, कृषी संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, शेतकरी गट यांना यावेळी ‘आत्मा’ यंत्रणेच्या माध्यमातून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. हेही वाचा: रब्बी हंगामाची गरज भागवण्यासाठी खतांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता

Comments are closed.