
Last Updated on November 27, 2022 by Taluka Post
नाशिक : अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ आणि ढगफुटीसारख्या नैसर्गिक संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सुमारे १२ हजार कोटीची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. येत्या १५ दिवसांत सर्व शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप केले जाईल कोणताही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, तसेच पीक विम्याचे पैसेही सर्वांना मिळतील, यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. कृषिथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. राज्यातील कृषी क्षेत्रात कार्यरत अन्य संस्थांनी याचा आदर्श घ्यावा, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी ह्यूमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबीटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित ‘कृषिथॉन’ प्रदर्शनात कृषी सेवा केंद्र पुरस्कारांचे वितरण कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अब्दुल सत्तार म्हणाले की, देशातील तसेच राज्यातील शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. शेतीक्षेत्रात नवक्रांती घडवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असून, त्याला कृषिथॉनसारख्या प्रदर्शनाची जोड मिळत आहे, ही अत्यंत समाधानाची आणि कौतुकाची बाब आहे. राज्यातील शेतकरी अनेक अडचणीतून बाहेर जात आहे, तरीही राज्य शासनाच्या वतीने त्यांला मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यंदा विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांसाठी सुमारे १२ हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या मदतीचे वाटप करण्यात येत आहे. येत्या १५ दिवसांत सर्व मदतीचे वाटप करण्यात येईल. इतकेच नव्हे, तर राज्यातील कोणताही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, त्या दृष्टीने पीक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आले आहेत, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.सत्तार
याप्रसंगी आ. दिलीप बनकर, आ. सीमा हिरे, नाडाचे उपाध्यक्ष अरुण मुळाणे, नाडाचे सचिव लक्ष्मीकांत जगताप, नाडाचे खजिनदार मंगेश तांबट, कृषी विभागाचे सहसंचालक मोहन वाघ, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक विवेक सोनवणे, चंद्रकांत ठक्कर, प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते, तर व्यासपीठावर कृषिथॉनचे आयोजक संजय न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, साहिल न्याहारकर, बापूराव पाटील, महेश हिरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले आदी उपस्थित होते. सुरुवातीला साहिल न्याहारकर यांनी प्रास्ताविकात या प्रदर्शनाच्या आयोजनाबाबतची माहिती दिली.