युक्रेन- रशियाच्या युद्धात शेतकऱ्यांना लाभ

Last Updated on December 2, 2022 by Jyoti S.

इथेनॉल वापराचे प्रमाण वाढले | राज्यातील शेतकऱ्यांना जास्त उत्पन्नाची

इथेनॉल निर्मितीतून यापुढे दरवर्षी वाढीव दोन ते तीन हजार कोटी रुपये साखर उद्योगात येण्याची चिन्हे आहेत. गेल्या हंगामात त्यामुळेच साखर उद्योगाची उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या घरात गेली. यंदा ही उलाढाल आणखी वाढेल. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते साखरेचे दर प्रतिकिलो 37रुपयांपेक्षा जास्त झाले, तर इथेनॉलनिर्मिती परवडणार नाही. पण हेच दर 34 रुपयांच्या आसपास राहिले, तर 65रुपये प्रति लिटर दर मिळणारे इथेनॉल परवडेल. इथेनॉलमधून साखर कारखान्यांना जादा पैसे मिळाले तर त्यांचा आर्थिक ताळेबंद सुधारेल. याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच होईल.

मुंबई : रशिया युक्रेन युद्धाचा इंधन तेलाच्या उपलब्धतेवर आलेला ताण पाहता देशात इंधन तेलात इथेनॉल मिसळण्याच्या परवानगीत वाढ होत असून त्याचा फायदा साखर कारखान्यांना, परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

चांगल्या पावसामुळे यंदाही राज्यात भरघोस ऊस उत्पादन झाले आहे. सर्व उसाचे गाळप व्हावे,शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बंदा साखर कारखान्यांच्या गळीत हंगामालाही लवकर सुरुवात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर मात्र पडलेले आहेत. दुसऱ्या बाजूला रशिया युक्रेन युद्धामुळे इंधन तेलाच्या उपलब्धतेवर ताण आला असून गरज भागवण्यासाठी केंद्र सरकार इंधन तेलात इथेनॉल मिळण्यास प्रोत्साहन देत आहे. राज्यातील साखर कारखाने या परिस्थितीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांच्या पदरात अधिक लाभ टाकू शकतात.शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देण्याबरोबरच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर जाऊही शकतात. राज्यातील अनेक साखर कारखान्यांच्या विस्तारीकरणामुळे राज्याची दैनंदिन गाळप क्षमता वाढली आहे. त्यामुळे यंदा शिल्लक उसाचा प्रश्न फारसा सतावणार नाही, असे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. इथेनॉलच्या मागणीत वाढ झाल्याने त्याचे दर चढ आहेत. गेल्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीतून 9 हजार 500 कोटी रुपये मिळाले. यंदा इथेनॉलमधून 12 हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.