
Last Updated on December 2, 2022 by Jyoti S.
सावरगाव तळच्या उत्पादकांना पुण्याच्या प्रयोगशाळेने दिले अधिकृत प्रमाणपत्र
संगमनेर : ‘विषमुक्त पिकवुया… विषमुक्त खाऊया अन् आपले आरोग्य निरोगी ठेवूया..!’ हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील 11 तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत नाविन्य पूर्ण बचत गट स्थापन करून, या माध्यमातून तब्बल 11 एकर क्षेत्रावर विषमुक्त भोपळ्याची लागवड यशस्वी केली. विशेष म्हणजे, तयार केलेला विषमुक्त भोपळा पुण्याच्या यु.व्ही. नोर्ड या प्रयोगशाळेने तपासणी करून नुकतेच प्रमाणपत्र दिले. त्यामुळे नक्कीच या विषमुक्त भोपळ्याला चांगली बाजार- पेठ मिळेल, अशी आशा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
पाणी फाउंडेशन अंतर्गत ‘फार्मर कप‘ स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील इतर गावांबरोबरच सावरगाव तळ गावाने सुद्धा सहभाग घेतला आहे. या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गट शेतीला प्राधान्य दिले गेले आहे. गट स्थापन करून प्रत्येक पिकासाठी फार्मर कपमध्ये त्याला संधी आहे.
गट शेतीला प्राधान्य दिले गेले आहे. गट स्थापन करून प्रत्येक पिकासाठी फार्मर कपमध्ये त्याला संधी आहे याचाच संकल्प ठेवून समृद्ध सावरगाव तळ या समृद्ध गावाने फार्मर कपमध्ये वारा शेतकरी गट स्थापन करून विविध पिकांवर काम चालू केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण पिकविलेला शेतमाल विषमुक्त असणे महत्त्वाचे असल्यामुळे नाविन्यपूर्ण शेतकरी गट स्थापन करून, या गटात गावातील 11 तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 11 एकर शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचे रासायनिक खाते व औषधांचा वापर न करता केवळ सेंद्रिय खते व औषधे वापरून विषमुक्त भोपळ्याची लागवड केली. पाणी फाउंडेशनचे तालुका समनव्यक राजेंद्र जाधव यांनी पुणे येथील टीयुव्ही प्रा. लि. या कंपनीच्या युव्ही नोर्ड या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयोग शाळेत तपासणीस पाठविला होता. त्याचा रिपोर्ट नुकताच प्राप्त झाला आहे.
या तपासणीत माधव बबन नेहे, संदीप दत्तू थिटमे, बाळासाहेब म्हातारबा वाल्हेकर, नारायण रामनाथ नेहे, विलास कारभारी नेहे, लक्ष्मण बबन नेहे, ज्ञानदेव काशिनाथ जगदाळे, अरुण दामोदर नलावडे भास्कर लक्ष्मण नेहे, रमेश रामनाथ जाधव, भारत दत्तू नेहे या 11 शेतकऱ्यांचा विषमुक्त भोपळा या तपासणीत पास झाला आहे.
दरम्यान, हे वृत्त गावात येताच सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ गावात दिवसेंदिवस एकच पिक घेतल्यामुळे शेती उत्पादन घटले होते, मात्र शेतकऱ्यांनी एकत्रित येत वरद जातीची 810 लागवड केली. त्यासाठी संपुर्ण जैविक खते, फवारे, सेंद्रीय खते व स्लरीचा जास्त प्रमाणात वापर केला आणि विषमुक्त भोपळा शेतीचे उत्पादन सुरू केले आहे .