Last Updated on December 13, 2022 by Taluka Post
Nashik Farmer: पीकविम्यापासून ३५ हजार शेतकरी वंचितच पालकमंत्र्यांकडून झाडाझडती : आठ दिवसांत निधी देण्याची सूचना ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
नाशिक(Nashik Farmer): जिल्ह्यात दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरली, त्यापैकी ८१ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने त्यांनी तसे पीक विमा कंपनीस कळविले. मात्र त्यापैकी अवघ्या ४६ हजार शेतकऱ्यांच्याच खात्यावर नुकसानीचे पैसे वर्ग झाले. मात्र ३५ हजार शेतकरी अद्यापही वंचित असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघडकीस आली.
पालकमंत्री दादा भुसे यांनी येत्या आठ दिवसात या प्रकरणांची पूर्तता करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. नियोजन समितीच्या बैठकीत पीक विम्याचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्ह्यातील एक लाख ६५ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग नोंदविला. त्यापैकी ८१ हजार ४९० शेतकऱ्यांनी विमा कंपनीला नुकसानीची माहिती कळविली.
त्यापैकी ४६ हजार ७४७ शेतकऱ्यांना १४ कोटी ५० लाखाचे वाटप करण्यात आले. उर्वरित ३५ हजार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे काय असा सवाल पालकमंत्री भुसे यांनी विचारला. तर आमदार हिरामण खोसकर यांनी इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांनी कळवूनही विमा कंपनीने त्यांच्या क्षेत्राची पाहणीच केली नसल्याची तक्रार केली. त्यावर विमा कंपनीच्या प्रतिनिधीने १६ हजार २५७ शेतकऱ्यांचे नाममात्र नुकसान झाल्याचे सांगितले व सहा हजार शेतकऱ्यांचे बनावट तक्रारी असल्याचे आढळून आल्याचे तसेच ११ हजार ९०० शेतकऱ्यांच्या विमा रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
त्यावर येत्या आठवडाभरात सर्व प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. या बैठकीस विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बोरसे, सीमा हिरे, देवयानी फरांदे, नितीन पवार, राहुल ढिकले, राहुल आहेर, मौलाना मुफ्ती यांच्यासह जिल्हाधिकारी गंगाथरण, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलिस अधीक्षक शहाजी उमप, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
राजस्व अभियान, महाआरोग्य शिबिर राबविणार घरोघरी
जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत महाराजस्व अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानांतर्गत गावागावात शासकीय अधिकारी जावून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच येत्या २५ डिसेंबर ते २५ जानेवारी या काळात स्व. आनंद दिघे
महाआरोग्य अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. या अभियानात मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, गावागावात टप्याटप् राबिवण्यात येणार असल्याचेही भुसे यांनी सांगितले.
हेही वाचा: Chakan: चाकणमध्ये बटाटा, लसूण व टोमॅटोची विक्रमी आवक