
Last Updated on December 3, 2022 by Taluka Post
नाशकात ‘आत्मा’तर्फे ६ ते १० डिसेंबरदरम्यान आयोजन
नाशिक : महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतीगृह मैदान येथे ६ ते १० डिसेंबर दरम्यान कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातून सेंद्रीय शेतीबरोबरच कृषी तंत्रज्ञानाचा जागर होणार आहे. पाच दिवसीय महोत्सवात शेतकऱ्यांसाठी परिसंवाद, आधुनिक शेती अवजारे प्रदर्शन, शेतकरी सन्मान सोहळा, खाद्य महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली.
?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार असून, पालकमंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या महोत्सवात दोनशे पेक्षा जास्त स्टॉल्स असणार आहेत. विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासकीय दालने, शेतातील शेतकऱ्यांचा शेतमाल थेट शहरी ग्राहकांच्या घरात पोहचावा यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री, सेंद्रीय शेतमाल विक्री तसेच शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट यांच्यामार्फत उत्पादीत केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ विक्रीसाठी गटांना स्टॉलस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी विविध शेती पध्दती, फळे व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योग, महिला परिसंवाद तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षांच्या अनुषंगाने विविध विषयांवर परिसंवादाचे आयोजन केले आहे. प्रगतीशील शेतकऱ्यांना यावेळी विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. कृषी महोत्सवात प्रवेश विनामुल्य(Free ) असल्याने शेतकरी, नागरिकांनी या महोत्सवात सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
कृषी प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
- अन्नप्रक्रियेच्या माध्यमातून कृषी समृध्दी
- तृणधान्य पिकांना प्रोत्साहन
- शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री
- खरेदीदार विक्रेता संमेलन
- परिसंवाद व चर्चासत्रे सेंद्रीय शेतमाल विक्री
- आधुनिक शेती अवजारांचे प्रदर्शन
- खाद्य महोत्सव
- धान्य महोत्सव
- दोनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग परदेशी भाजीपाला प्रदर्शन
खाद्य महोत्सव ठरणार आकर्षण
ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे विविध खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत. यामध्ये शेगाव कचोरी, नागलीची भाकरी, चटणी, मांडे, मटन भाकरी, भरीत भाकरी, थालीपीठ, खेकडा भाजी व भाकरी, खान्देशी जेवण, मशरूमच्या पाककृती, कढी, खिचडी, दालबाटी, कुळीदाचे शेंगुळे आदी खाद्यपदार्थांची चव नागरिकांना चाखता येणार आहे: