
Last Updated on November 22, 2022 by Taluka Post
महिनाभरात सर्वेक्षण करून उपाययोजना करणार
नाशिक : महापालिकेने केलेल्या पाहणीत शहरातील सहाही विभागांत तब्बल 118 अपघात प्रवणक्षेत्र अर्थात ब्लॅक स्पॉट असल्याचे समोर आले आहे. महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक पोलीस शाखेतर्फे येत्या महिनाभरात अपघात प्रवणक्षेत्रांचे सर्वेक्षण केले जाणार असून, आवश्यक उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी केली जाणार भागांत असल्याची माहिती शहर अभियंता अर्थात शिवकुमार वंजारी यांनी दिली आहे.
औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरची चौकात झालेल्या बस अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने वाहतुकीचे ब्लॅक स्पॉट दूर करण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार महापालिका मुख्यालयात 10 नोव्हेंबर रोजी ट्रॅफिक सेलची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत वाहतुकीच्या ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून महापालिकेला अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार रेझिलिएंट इंडिया कंपनीचे पदाधिकारी व महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात शहरातून जाणारे राष्ट्रीय, राज्य महामार्गांच्या ठिकाणी 23 ब्लॅक स्पॉट असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर महापालिकेने शहरातील रस्त्यांचे 19 सर्वेक्षण करून आणखी 95 नवे ब्लॅक स्पॉट शोधून काढले आहेत. आता या ब्लॅक स्पॉटचे महिनाभरात सूक्ष्म सर्वेक्षण केले जाणार असून, अपघात प्रवण क्षेत्राच्या निराकरणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.
Comments are closed.