
Last Updated on December 5, 2022 by Jyoti S.
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व रेवती रॉय फाऊंडेशन यांच्यामार्फत महिलांसाठी सीएनजी गॅस स्टेशन आणि पेट्रोल पंप सेवक (Gas / Petrol Station Attendant) अभ्यासक्रमाचा प्रारंभ नुकताच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत झाला. यातून प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना गॅस स्टेशन, पेट्रोल पंप येथे रोजगार उपलब्ध होईल.
महिला लाभार्थीना प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षणाचा कालावधी ७ दिवसांचा आहे. या संस्थेमार्फत ९० दिवसांचे ऑन जॉब ट्रेनिंगही महिलांना देण्यात येईल. प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थीना मासिक १२ ते १५ हजार रुपये वेतनावर भारत सरकारच्या अखत्यारीतील पेट्रोलियम कंपन्यांच्या सीएनजी गॅस स्टेशन, पेट्रोल पंप येथे नियुक्त करण्यात येईल.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
मंत्री लोढा यांनी अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी कमी कालावधीचे कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी देण्याबाबत सूचित केले होते, त्यानुसार नुकताच या प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. मुंबई उपनगर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रवीण खंडारे, रेवती रॉय फाऊंडेशनचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशन येथे शाश्वत विकास ध्येय प्रकल्प २०२२-२३ अंतर्गत या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी लोढा यांनी कौशल्य विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाश्वत विकास ध्येय लघू प्रकल्पांतर्गत अल्प उत्पन्न गटातील महिलांच्या कौशल्य विकास आणि रोजगारासाठी हा कार्यक्रम राबवला जातो.