
Last Updated on November 20, 2022 by Taluka Post
पाच दिवसांत नार्को चाचणीचे कोर्टाचे निर्देश
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाची पाच दिवसांत नार्को चाचणी पूर्ण करा, तसेच आरोपीविरोधात थर्ड डिग्रीचा वापर करू नका, असे स्पष्ट निर्देश दिल्लीतील न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी तपासासाठी दिल्ली पोलिसांची पथके मुंबई, गुरुग्राम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला रवाना झाली आहेत. पोलिसांच्या एका पथकाने आफताब काम करत असलेल्या गुरुग्रामधील कार्यालयात जाऊन चौकशी केली
कार्यालयातून आफताबशी संबंधित काही वस्तू, कागदपत्रे जप्त करण्यात आली. दरम्यान, या हत्याकांडात शुक्रवारी नवा खुलासा झाला. श्रद्धाचा एक नवा फोटो समोर आला असून, यामध्ये तिच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत. श्रद्धाच्या एका मित्राने हा फोटो शेअर केला आहे. एवढेच नाही, तर मुंबईलगतच्यावसईतील एका रुग्णालयात श्रद्धा डिसेंबर २०२० मध्ये तीन दिवस दाखल होती, अशी माहितीदेखील हाती लागली आहे. मारहाणीमुळे तिला अंतर्गत दुखापत झाली होती. यावरून श्रद्धाला तिचा प्रियकर आफताब पूनावाला बेदम मारहाण करत होता, असे स्पष्ट होत आहे.
दिल्ली पोलिसांनी श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर याची चौकशी केली. सूत्रांच्या माहितीनुसार आफताब व्यसनांच्या आहारी गेला होता. तो नशेत असताना श्रद्धाला मारझोड करायचा. श्रद्धाच्या काही मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब तिच्या आयुष्यात येण्यापूर्वी ती एक हसतमुख मुलगी होती.
Comments are closed.