
Last Updated on December 3, 2022 by Jyoti S.
सुरगाणा ग्रामस्थांची गुजरातमध्ये विलीन होण्याची मागणी
नाशिक : सांगलीच्या जत तालुक्यातील ग्रामस्थांनी कर्नाटकमध्ये जाण्याची मागणी केल्यानंतर आता सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थांनी गुजरातमध्ये विलीन होण्यांची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी याबाबत तहसीलदार सचिन मुळिक यांना निवेदन दिले आहे. रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा झाला; मात्र सुरगाणा तालुक्यात अजूनही आदिवासी बांधव जीवनावश्यक सोयी-सुविधांपासून वंचितच आहेत. आमच्या विकासाचा अनुशेष भरून काढावा; किव्हा आमचा समावेश गुजरात राज्यात करावा. १ मे १९६१ पूर्वी गुजरात राज्यातील वघई,आहवा-डांग हा भाग महाराष्ट्र राज्यात होता. आजही सुरगाणा तालुक्यातील गुजरात राज्याच्या सीमेलगतचा भाग अतिदुर्गम, अविकसित, मागासलेला, महाराष्ट्र शासनाने दुर्लक्षित केलेला असा असून, नागरी मूलभूत सुविधांपासून वंचितच आहे. या भागात महाराष्ट्रातील रस्ते कच्चे, उखडलेले, गुडघाभर खड्डे पडलेले आहेत; तर सीमेलगतचे गुजरात राज्यातील रस्ते पक्के, डांबरीकरणाने चकाचक झाले आहेत. त्यामुळे बर्डीपाडा येथून नाशिकला जाण्यासाठी चार ते पाच तास लागतात, तर सुरत येथे जाण्यासाठी केवळ दोन-अडीच तास लागतात. अंतर मात्र दोन्ही शहरांचे सारखेच आहे.
गुजरात राज्यात आरोग्यसेवा तत्पर, अतिजलद गतीने मिळते. रुग्णवाहिका, रुग्णालयातील सोयीसुविधा खाजगी, सरकारी व सेवाभावी संस्थांमार्फत नाममात्र शुल्कात मिळतात. महाराष्ट्रात जिल्हा रुग्णालयात मिळणार नाही, तीच सेवा धरमपूर, बलसाड, खारेल, बिलिमोरा, चिखली, सुरत, बडोदा या ठिकाणी अल्पदरात मिळते. या सर्व बाबींचा विचार करता, आम्हाला गुजरातमध्ये विलीन करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा