आफ्रिकेच्या आठ विद्यार्थ्यांना नाशकात घातला गंडा !

Last Updated on November 24, 2022 by Jyoti S.

सदनिकेसाठी दिलेली अनामत रक्कम दलालांनी लाटली; जीवे मारण्याचीही धमकी दिली


दोघा संशयितांनी सर्व मित्रांना सोमेश्वर भागात भाडेतत्त्वावर फ्लॅट शोधून दिले. त्यानंतर घरमालकांकडून डिपॉझिटची (अनामत) मागणी करण्यात आल्याने फसवणुकीचा हा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी संपर्क साधला असता, काही दिवस संबंधितांनी टोलवाटोलवी केली. मात्र, संबंधितांनी सोमवारी (दि. 21) बाबालोला याच्याशी संपर्क साधून जीवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या बाबालोला यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संशयितास अटक केली असून, त्याचा साथीदार पसार झाला आहे. अटक केलेल्या संशयितास न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

नाशिक : शिक्षणासाठी दक्षिण अफ्रिकेतून नाशकात आलेल्या आठ विद्यार्थ्यांना सदनिका शोधून देणाऱ्या दोघा भामट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. घरमालकास देण्यासाठी अनामत म्हणून दिलेल्या रकमेचा भामट्यांनी अपहार केल्याने हा प्रकार समोर आला आहे. संशयितांनी विद्यार्थ्यांना जीवे आरण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलिसांत पोहोचला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल प्रकाश मुदिराज (वय 37, रा. संगीत रेसि. गोविंदनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, गणेश पांडुरंग पाटील (वय 25, रा. योगेश हॉटेलसमोर, खुंटवडनगर) हा त्याचा साथीदार फरार आहे. याप्रकरणी मोसेस टोटलीसंग बाबालोला (वय 21 मूळ रा. सेंडीन टॉन, द. अफ्रिका, हल्ली आस्था रेसि. गंगापूर रोड) या विद्यार्थ्यांने तक्रार दाखल केली आहे. बाबालोला याच्यासह डारायस गोल, डेटीमले एबार, डेव्हिड डेमी, बुसी, बरनाडो, लॉरिन व नोबार्ट आदी साउथ अफ्रिकेतील विद्यार्थी स्वायत्त विद्यापीठ असलेल्या एका नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत. पूर्वी शिक्षण घेतलेल्या मित्रास संशयितांनी भाडेतत्त्वावर घर शोधून दिल्याने या विद्यार्थ्यांनी संशयितांशी संपर्क साधला होता. गंगापूर रोड भागात फ्लॅट मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी सप्टेंबर महिन्यात संशयितांची शिंगाडा तलाव भागातील त्यांच्या श्रीजी युनिपार्क येथील कार्यालयात भेट घेतली होती. यावेळी बाबालोला यांनी रोख 43 हजार व फोन पेच्या माध्यमातून 17 हजार रुपये संशयितांच्या स्वाधीन केले होते. उर्वरित मित्रांनीही सर्व मिळून तब्बल तीन लाख 37 हजार रुपये संशयितांना अदा केले होते. हेही वाचा : श्रद्धा वालकर हत्याकांड : आफताबवर थर्ड डिग्री नको

Comments are closed.