Last Updated on January 5, 2023 by Taluka Post
Harihar Fort: हरिहर किल्ल्यावरील दुर्घटनांवर नियंत्रण
त्र्यंबकेश्वर(Harihar Fort): येथून जवळच असलेल्या व पर्यटकांचे आकर्षण स्थळ बनलेल्या हर्षवाडी येथील हरिहर तथा हर्ष किल्ल्यावरील वाढत्या दुर्घटना रोखण्यासाठी वन विभागाने पाऊल उचलले आहे. किल्ल्यावर जाणारे पर्यटक व गिर्यारोहकाची एकाचवेळी गर्दी होऊ नये, यासाठी वन विभागाकडे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली आहे.
अभेद्य गड सुस्थितीत ज्यावेळेस इंग्रजांनी महाराष्ट्रातील गड किल्ले जिंकले, तेथील गड किल्ल्याची तोडफोड केली, त्यांच्या पायया तोडल्या, पण हरिहर गड ज्या इंग्रज अधिकाऱ्याने जिंकला तो या गडाची रचना पाहून अक्षरशः थक्क झाला होता. त्याने या गडाच्या पायया तोडल्याच नाहीत व गडाचे नुकसानदेखील केले नाही. असा हा अभेद्य गड आजही सुस्थितीत आहे. त्र्यंबकेश्वर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून येथे नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे व्यवस्थाही चांगली ठेवली आहे.
दहा जणांची मर्यादा
■ एकावेळेस एकच जण या गडावर चढू वा उतरू शकेल अशी सोय आहे. तरीदेखील गर्दी होत असल्याने दुर्घटना घडण्याचे प्रकार वाढीस लागले होते. ते रोखण्यासाठी वन विभागाच्या वतीने एका वेळेस फक्त दहा माणसांचा गट वर सोडायचा आणि ती माणसे खाली उतरल्यावर दुसरा गट सोडायचा.
■ ही जबाबदारी या भागातील तरुणांवर सोपविण्यात आली असून या माध्यमातून त्यांना रोजगार मिळू लागला आहे. यातील एक जण खाली थांबून गर्दीवर नियंत्रण ठेवतो व रांगेतील दहा जणांचा ग्रुप वर सोडण्याचे काम करतो.
सेल्फीला मनाई
■ पर्यटकाचे नियंत्रण करणाऱ्या चमूतील एक जण किल्ल्याच्या मध्यभागी उभा राहून कोणाला काही त्रास होत आहे का. मदतीची गरज आहे का, यावर लक्ष ठेवतो. आवश्यक त्याठिकाणी मदत करतो, तर दुसरा किल्ल्यावर उभा राहून तो एकेका माणसाला खाली सोडतो.
■ अर्थात हे वेळकाढू धोरण असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य आहे. कारण मागे याच किल्ल्यावर जिन्यात चेंगराचेंगरी झाली होती. त्यानंतर एक महिला सेल्फीच्या प्रयत्नात वरून खाली पडली व मरण पावली होती. त्यामुळे सूचना फलक लावण्यात आले आहेत.
?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
हरिहर गडाचे वैशिष्ट्य
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गडकोट किल्ल्यांमध्ये त्र्यंबकेश्वर परिसरातील हर्ष किल्ला तथा हरिहर गड प्रसिद्ध आहे, पूर्ण पायऱ्या हेच या गडाचे वैशिष्ट्य आहे. हा किल्ला अजिंक्य व अभेध राहावा यासाठी गडावर एकावेळी एक माणूस चढेल व उतरेल अशी सोय आहे.
हेही वाचा: Insurance for animals: जनावरांना 300 रुपयांचा विमा, नुकसान झाल्यास 88 हजार रुपये सरकार देणार