अंबडला वृद्धाच्या हत्येच्या तपासासांठी सहा पथके

Last Updated on November 27, 2022 by Jyoti S.

पोलीस ठाण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत

अंबडला : औद्योगिक वसाहतीतील दरोडा आणि खुनाच्या घटनेस वेगळीच कलाटणी मिळाली आहे. चोरीच्या उद्देशानेच ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा कयास असून, परिचिताचे हे कृत्य असल्याचे बोलले जात आहे. या घटनेत घरातील पैसे आणि दागिने असलेली कोठीच पळविण्यात आल्याने, तसेच मालमत्तेच्या वादाची किनार या घटनेस असल्याने पोलिसांकडून सर्व बाजू तपासल्या जात आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी अवघे पोलीस दल कामाला लागल्याने लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. परिसरातील अंबड लिंक रोडवरील कडेल मळा येथे एका 65 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. 25) रात्री घडली होती.

या घटनेच्या तपासासाठी अंबड पोलिसांनी सहा विशेष पथके तयार केली आहेत. त्याचबरोबर गुन्हे शोध पथकाचीही काही पथके तयार केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंबड भागात वारंवार गुन्हेगारी घटना घडत असल्याने पोलीस ठाण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.माहिती याबाबत अधिक अशी की, जगन्नाथ बच्चू कर्डेल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घरात असलेल्या हळद समारंभासाठी सर्व जण बाहेर गेले होते. तर वडील बच्चू सदाशिव कर्डेल (वय 65) यांना बरे वाटत नसल्याने ते घरीच होते. रात्री 8.30 वाजेच्या सुमारास त्यांच्याशी फोनवरून बोलणे देखील झाले होते. जगन्नाथ कर्डेल रात्री 9.45 वाजेच्या सुमारास त्यांचा पुतण्या दिलीप कर्डेल याच्या सोबत घरी आले. दिलीपने त्यांना घराबाहेर सोडले व तो निघून गेला. त्यानंतर जगन्नाथ घराजवळ गेले असात, घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वडिलांना बाहेरून आवाज दिला; परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी घरात प्रवेश केला, त्यावेळी बच्चू कर्डेल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. जगन्नाथ यांनी लागलीच पुतण्या दिलीपला फोन करून घरी बोलावून घेतले.

यानंतर दिलीपने सर्व नातेवाइकांनाही हळदी समारंभातून घरी बोलावले.घराची पाहणी केली असता घरातील कोठीत ठेवलेली 10 लाखांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, बँकेची कागदपत्रे यांसह कोठीच उचलून नेल्याचे लक्षात आले. घटनेची खबर मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलीस उपायुक्त ‘चंद्रकांत खांडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख आदींनी या ठिकाणी भेट दिली. याबाबत जगन्नाथ यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात संशयिताविरोधात कलम 460 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.