
Last Updated on November 26, 2022 by Taluka Post
नवी दिल्ली: भारताचा इतिहास हा शौर्याचा आहे. मात्र तो जाणीवपूर्वक दडपून टाकण्यात आला. वसाहतवादाच्या काळातील हा अजेंडा स्वातंत्र्यानंतर बदलण्याची आवश्यकता होती. परंतु तेव्हादेखील दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आपले सरकार काळाच्या उदरात गडप झालेल्या शूरवीरांना जगासमोर आणून जुन्या चुका सुधारत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आसाममधील अहोम साम्राज्याचे शूरवीर लचित बोडफूकन यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त वर्षभर आयोजित कार्यक्रमांच्या समारोपप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते.
मोदींनी लचित बोडफूकन यांच्या शौर्याचा उल्लेख करत मुघलांविरोधात लढणाऱ्या आसामच्या हजारो शूरवीरांचे बलिदान आपल्यासाठी महत्त्वाचे नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. भारताचा इतिहास केवळ गुलामगिरीचा नाही. आपला इतिहास योद्ध्यांचा आहे, अत्याचाऱ्यांविरोधात अभूतपूर्व शौर्य, पराक्रम दाखवणाऱ्यांचा आपला इतिहास आहे. परंतु दुर्दैवाने गुलामीच्या काळात जो इतिहास आपल्याला शिकवला गेला तीच शिकवण स्वातंत्र्यानंतरही सुरू होती, असे मोदी म्हणाले. आपल्या शूरवीरांचा त्याग, समर्पणाच्या गाथांना इतिहासातून वगळण्याची आधी झालेली चूक आपले सरकार सुधारत आहे. लचित बोडफूकन यांच्या जयंतीचे दिल्लीतील आयोजन याचे एक उदाहरण आहे. देश आता गुलामगिरीची मानसिकता सोडून आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगत आहे. भारत आपल्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करतानाच संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या ऐतिहासिक नायक-नायिकांचे स्मरण करत आहे, असेही मोदींनी सांगितले. लचित बोडफूकन यांच्या ४०० व्या जयंती महोत्सवाचे उद्घाटन आसामच्या जोरहाटमध्ये फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले होते.
लचित बोडफूकन हे आसामच्या अहोम साम्राज्याचे सेनापती होते. औरंगजेबाच्या नेतृत्वात मुघल सैन्याने १६७१ साली आसाम बळकावण्यासाठी केलेला हल्ला लचित यांच्या नेतृत्वाखाली शूरवीरांनी परतावून लावत मुघलांना पराभूत केले होते. या विजयाच्या स्मरणार्थ २४ नोव्हेंबर लचित दिन म्हणून साजरा केला जातो..