
Last Updated on November 28, 2022 by Jyoti S.
मनमाडला बेकरी व्यावसायिकांच्या संपानंतर भाववाढ निश्चित
गेल्या दोन दिवसापासून बेकरी उत्पादकांनी पावाचे उत्पादनच बंद केल्याने शहरातील हॉटेल व उपहार गृहामध्ये पावाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बाहेरच्या शहरातून जादा दराने पाव आणून आपले हॉटेल सुरु ठेवावे लागले. मात्र दोन दिवस याचा मोठा आर्थिक फटका हॉटेल चालकांना सहन करावा लागला आहे. दोन दिवस बेकरी चालकांनी संप पुकारल्यानंतर अखेर 30 टक्के भाव मान्य झाली आहे. प्रति डझनमागे 5 रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे याचा फटका आता गोर- गरिबांसह सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे यात शंका नाही.
मनमाड : अनेक गोर-गरीब सर्वसामान्यांचेपोटभर जेवण म्हणून असलेल्या हक्काच्या पावाची आता दरवाढ अटळ असून दरवाढीसाठी मनमाड बेकरी असोसिएशनतर्फे दोन दिवसांपासून पावाचे उत्पादन बंद केले. दरम्यान कच्या मालाच्या भाववाढीच्या निषेधार्थ येथील बेकरी चालक व बेकरी मालकांनी शुक्रवार (दि.25) पासून बेमुदत संपाची हाक दिली. त्यामुळे शहरात पावची टंचाई निर्माण झाल्याने हॉटेल चालकांना बाहेरच्या शहरातून जादा भावाने पाव आणावे लागल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या संदर्भात बेकरी चालक व बेकरी मालक यांची बैठक होऊन या बैठकीमध्ये मैदा, तेल, लाकूड, इंधन आदी बेकरी उत्पादन तयार करणाऱ्या कच्च्या मालाच्या मोठ्या प्रमाणात भाववाढ झाल्याने बेकरी व्यवसाय अडचणीत सापडला असून बेकरी व्यवसायावर मोठे संकट सुभे राहिले असल्याने या भाववाढीच्या निषेधार्थ बेकरी व्यवसाय करणाऱ्या चालक, मालकांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान तीस टक्के म्हणजे डझनमागे पाच रुपयाची दरवाढ केल्याचे बैठकीत ठरले आहे. दरवाढीमुळे होलसेल भावांमध्ये ही दरवाढ करण्यात येत असून यासाठी ग्राहकांनी परिस्थिती समजून सहकार्य करावे, असे आवाहन ही यावेळी झालेल्या बैठकीत बेकरी चालक, बेकरी मालकांनी ग्राहक व जनतेला केले आहे..