
Last Updated on November 28, 2022 by Jyoti S.
लंडन : बॅक्टेरियल इन्फेक्शन ही आता जगासमोरील नवी समस्या बनली आहे. बॅक्टेरियर इन्फेक्शनने सन 2019 या वर्षात जगभरात तब्बल 77 लाख लोकांचा बळी घेतला आहे. ‘लॅन्सेट जर्नल’ या प्रतिष्ठित नियतकालिकामध्ये यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या सर्वेक्षणामध्ये जगभरातील 204 देशांमधील आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले आहे.
संशोधनातून असे आढळून आले आहे की, बॅक्टेरियल इन्फेक्शन हळूहळू • जीवघेणा साथीचा आजार ठरू लागले आहे. ही समस्या एवढी उग्र बनली आहे की, जगभरात हृदयविकारानंतरचे मृत्यूचे हे दुसरे प्रमुख कारण बनले आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे सन 2019 मध्ये जगभरातील 13 टक्के लोकांना आपले प्राण गमवावे लागले. म्हणजेच या संक्रमणामुळे जगातील दर आठ पैकी एका व्यक्तीचा बळी गेला. बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी 33 प्रकारचे बॅक्टेरिया मुख्यत्वे जबाबदार ठरतात. या बॅक्टेरियांमुळे विविध प्रकारचे संक्रमण होऊ शकते. या संक्रमणाचे 11 प्रकार आजवर वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत.
भारतात 5 बॅक्टेरियांचे थैमान
अहवालानुसार, भारतामध्ये 5 प्रकारच्या बॅक्टेरियांनी सर्वाधिक बळी घेतले आहेत. ई. कोलाय, एस. न्यूमोनिया, के. न्यूमोनिया, एस. ऑरियस आणि ए. बॉमेनियाई अशी त्यांची नावे आहेत. एकट्या ई. कोलाय बॅक्टेरियाने भारतात 1 लाख 60 लोकांचा बळी घेतला आहे. तर जगभरात एस. ऑरियस आणि ई. कोलाय बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे 8 लाख 64 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा आकडा एचआयव्ही-एड्सने होणाऱ्या मृत्यूंपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.
या रोगांना कारणीभूत ठरतात बॅक्टेरियल इन्फेक्शन
बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. ई. कोलाय हा बॅक्टेरियाचा एक समूह आहे. या समूहातील काही बॅक्टेरिया पोटात शिरून इन्फेक्शन पसरवतात. ज्यामुळे संक्रमित व्यक्तीची किडनी खराब होते आणि प्रसंगी मृत्यूही ओढवतो.
• एस. न्यूमोनिया हा बॅक्टेरिया कान आणि रक्तामध्ये संक्रमण पसरवतो. याचा प्रभाव लहान मुलांमध्ये जास्त दिसून येतो. हे इन्फेक्शन मेंदू आणि श्वासनलिकेवर प्रभाव टाकते. तर के. न्यूमोनिया हा बॅक्टेरिया ब्लड) इन्फेक्शन आणि शत्रक्रिया झालेल्या भागात संक्रमण पसरवतो. स्वच्छतेची काळजी न घेतल्यास हे इन्फेक्शन जीवघेणे ठरू शकते.
एस. ऑरियस बॅक्टेरियामुळे जास्त करून स्कीन इन्फेक्शनशी संबंधित समस्या उद्भवतात. हा बॅक्टेरिया श्वास नलिकेमध्ये लपून बसतो.
• ए. बॉमेनियाई बॅक्टेरिया रोग प्रतिकारक शक्त कमी असलेल्या लोकांवर हल्ला करतो. या बॅक्टेरियामुळे रक्त, मूत्रमार्ग आणि फुफ्फुस यांच्यामध्ये संक्रमण पसरवतो.