नाशकात शिंदे गटाला मोठा जॅकपॉट?

Last Updated on November 26, 2022 by Taluka Post

नाशिक : सिडकोतील माजी का नगरसेविका हर्षदा गायकर यांनी प्रभागातील विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्याच्या बॅनरवर प्रा. शिंदे गटाचे खा. हेमंत गोडसे यांचे का फोटो झळकविल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असतानाच नाशकात शिंदे गटाच्या हाती मोठा जॅकपॉट लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे तब्बल बारा माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पक्षात प्रवेश “करणार असल्याचे बोलले जात आहे. सिडको, सातपूर आणि पंचवटीतील हे माजी नगरसेवक येत्या सोमवारी (दि.२८) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली तेव्हा नाशिकमधून पालकमंत्री दादा भुसे, आ. सुहास कांदे यांच्यासह खा. हेमंत गोडसे हे शिंदेंच्या बंडात सामील झाले होते. प्रवीण तिदमे यांना महानगरप्रमुखपद देऊ केल्याने ते शिंदे गटात आले. श्यामकुमार साबळे हे पूर्वीपासूनच दादा भुसे समर्थक असल्यामुळे उघडपणे ते शिंदे गटात सहभागी झाले होते. मात्र, ठाकरे गटातील अन्य बडे पदाधिकारी वा माजी नगरसेवक फोडण्यात शिंदे गटाला फारसे यश आले नव्हते. त्यामुळे शिंदे गटाच्या पक्ष विस्तारात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच पालकमंत्री दादा भुसे, आ. सुहास कांदे, खा. हेमंत गोडसे यांच्यात वाद सुरू झाल्याने शिंदे गट अडचणीत आल्याची चर्चा होत होती.

पंधरा दिवसांपूर्वीच आ. सुहास कांदे यांनी शिंदे गटात आलेल्या पदाधिकाऱ्यांवरून भुसेंना खडे बोल सुनावले होते. त्यामुळे भुसेंनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत, नाशिकमध्ये ठाकरे गटाला डॅमेज करण्याचे नियोजन केले आहे.ठाकरे गटात नाराज असलेले सुमारे डझनभर नगरसेवक हे सोमवारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.भाजपचा राजीनामा दिलेल्या माजी नगरसेविका इंदूबाई नागरे सोबतच या माजी नगरसेवकांचा प्रवेश करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

महापालिकेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी कल्पना पांडे आणि सत्यभामा गाडेकर या दोन नगरसेविकांचे निधन झाले, तर प्रवीण तिदमे आणि श्यामकुमार साबळे यांनी आधीच शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेने (ठाकरे) कडे ३१ माजी नगरसेवक उरले आहेत. आता त्यापैकी १२ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या सर्वांचे प्रवेश सोमवारी (दि.२८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होत आहे. त्यामुळे ठाकरे गट आता काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या,महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?