येळकोट येळकोटच्या जयघोशात मनेगावला खंडेराव महाराज यात्रा उत्साहात .

Last Updated on December 1, 2022 by Taluka Post

मनेगाव: पन्नास हजाराहुन अधिक भाविक खंडोबा चरणी लीन सालाबाद प्रमाणे भरणाऱ्या खंडेराव महाराज यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी चंपाषष्टीच्या मुहूर्तावर उपस्थिती दर्शवत बेल भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारच्या नामघोषाने मनेगाव नगरी दुमदुमली होती . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडीत झालेली यात्रा दोन वर्षानंतर प्रथमच होत असल्याने भाविक देवदर्शनासाठी आसुसलेला होता.

यात्रेस चाकरमान्यांसह पंचक्रोशीतील भाविकांबरोबरच माहेरवाशींनी अलोट गर्दीचा उच्चांक गाठत सुमारे ५० हजाराहून अधिक भाविकांनी नतमस्तक होत कुलदैवताचे दर्शन घेतले . चंपाषष्ठी निमित्त पहाटे यात्रा कमिटीचे अध्यक्ष गणेश शिंदे , उपाध्यक्ष विलास सोनवणे , सरपंच संगीता शिंदे आदींनी खंडेराव महाराजांच्या मूर्तीस अभिषेक केला . सकाळी ८.३० वाजता मुखवट्याची सजवलेल्या पालखीसह दीडशेहून अधिक कावडी धारकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे , पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे , गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी वृक्ष मित्र परिवाराच्या वतीने तसेच यात्रा कमिटी आणी ग्रामपंचायतीच्या वतिने कावडी धारकांचे व मान्यवरांचे स्वागत केले . वृक्षपरीवारातील सदस्य मधुकर घोडेकर यांनी त्यांचे वडील कै. लक्ष्मण नथुजी घोडेकर यांच्या स्मरणार्थ १०१ कावडी धारकांना मान्यवरांच्या हस्ते केशर आंब्याच्या झाडाचे वाटप केले . तसेच श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष भारत सोनवणे यांनीही सर्व कावडी धारकांचे आधुनिक पद्धतीचे फेटे बाधंत स्वागत केले . त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्या हस्ते वृक्ष मित्र परिवाराने वृक्षरोपण केले . सायंकाळी साडेसात वाजता धारणगाव येथील भक्त लक्ष्मण काळे यांनी मनेगावच्या बारा गाड्या ओढ्याच्या मानाची परंपरा कायम ठेवली. बारा गाड्या ओढण्यापूर्वी गुरेवाडी येथून आलेल्या मानाच्या काठीचे विधिवत पूजन केले काठी मिरवणूक झाल्यानंतर खंडेरायाचे भक्त लक्ष्मण काळे यांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत बारा गाड्या ओढल्या . यावेळी परिसरात होत असलेल्या फटक्यांच्या आतषबाजीने व रोषणाईने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले . दिवट्या बुधल्यांचा प्रकाशात आसमंत उजळून निघाला होता . बेल भंडार्याची उधळण करत मुखी खंडेराव महाराजांच्या जयघोषात भावीक मंत्रमुग्ध झाले होते .

दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता भव्य कुस्त्यांची दंगल पार पडली . पंचक्रोशीसह जिल्हाभरातून नामवंत पहिलवानांनी हजेरी लावत आपापले डावपेच टाकत उत्कृष्ट कुस्त्यांच्या खेळाचे प्रदर्शन दाखवले . यावेळी गावकऱ्यांच्या वतीने मल्लांवर अकरा रुपये पासून ते अकरा हजार रुपये पर्यंत बक्षिसांची लय लूट करण्यात आली. शेवटी चुरशीच्या झालेल्या कुस्तीपटूंना श्री नाम फाउंडेशन तर्फे भारत सोनवणे यांच्या हस्ते पैलवान विकी मोरे यांना 11 हजार रुपये रोख व मानाचा चषक प्रदान करण्यात आला तर बरोबरीत असलेले दुसरे पैलवान स्वराज पाटील यांना रोख दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले यात्रा उत्सव शांततेत व अभूतपूर्व उत्साहात पार पडला . यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी यात्रा कमिटीचे सदस्य तसेच सरपंच ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहाय्यक केले .

वृक्षमित्र परीवाराकडुन ग्रामस्वच्छता आणी वृक्ष लागवड तसेच संवर्धनासाठी जनजागृतीपर संदेश लावण्यात आले होते.या फलकांनी यात्रेकरुंचे लक्ष वेधत प्रबोधन केले .