Last Updated on January 2, 2023 by Jyoti S.
Nashik Police: दोनशे तळीरामांची पोलिसांनी रस्त्यावरच ‘उतरवली’ !
नाशिक(Nashik Police): शहरासह ग्रामीण भागातसुद्धा पोलिसांनी नव वर्ष स्वागताच्या निमित्ताने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शहर पोलिस आयुक्तालयात प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुख्य रस्त्यांवर चौकाचौकांत नाकाबंदी करण्यात आली होती.
यावेळी शहरासह जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या सुमारे २००पेक्षा जास्त तळीरामांची पोलिसांनी रस्त्यावरच नशा उतरवली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत धूमस्टाईल बेदरकारपणे वाहने दामटविणाऱ्यांनाही ‘खाकी’चा हिसका दाखवला.
सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्ष स्वागतासाठी लोकांनी तयारी करत पार्टीचा बेत आखून धमाल केली शनिवारी रात्री उघड्यावर पार्टी करताना सापडलेल्या तळीरामांना संबंधित पोलिस ठाण्यांच्या गस्ती पथकाने ताब्यात घेत वाहनांत डांबून ठाण्यांची सफर घडवली. शहराच्या हद्दीत मद्यप्राशन केलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
थंडीच्या कडाक्यात पोलिसांचा फौजफाटा तैनात
नाशिक शहर व परिसरात ४ पोलिस उपायुक्त, ६ सहायक आयुक्त, ३५ पोलिस निरीक्षक, १०० सहायक उपनिरीक्षक व उपनिरीक्षकांसह दोन हजार पोलिसांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात होते. राज्य राखीव दलाच्या १५० जवानांचा बंदोबस्तात समावेश होता.
काही भागांमध्ये पायी पेट्रोलिंग !
नाशिक शहर व परिसरातील मुंबई नाक्यासह अन्य काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वर्दळीच्या भागात पोलिस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसमवेत पुरुष, महिला अंमलदारांच्या पथकाने पायी पेट्रोलिंग केली.
रात्री बारानंतर रेस्टॉरंटमध्ये ‘नो एन्ट्री’
नाशिक शहरातील बहुतांश रेस्टॉरंटमध्ये रात्री साडेअकरा वाजण्याच्या पुढे नागरिकांना प्रवेश दिला गेला नाही. व्यावसायिकांनी नियमांचे पालन करत नव वर्ष सेलिब्रेशनची संधी ‘कॅच केल्याचे दिसून आले. शहरातील सर्वच हॉटेल्सच्या परिसरात रोषणाई करण्यात येऊन सजावट करण्यात आली होती. जवळपास सर्वच फॅमिली रेस्टॉरंटसह परमिट बारदेखील हाऊसफुल्ल झाले होते.
ब्रेथ अॅनालायझर कुठे पसंत कुठे नापसंत!
मद्यपींची तपासणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रेथ अॅनालायझर यंत्राचा वापर शहर पोलिसांनी टाळणे पसंत केले. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी आयुक्तांच्या आदेशान्वये घेण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी मात्र पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार ब्रेथ अॅनालायझरचा वापर करत मद्यपींवर कारवाई केली.
हेही वाचा: Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वरचे मंदिर राहणार या कारणामुळे एवढे दिवस बंद.