
Last Updated on December 7, 2022 by Jyoti S.
नाशिक : गोदातीरावरील श्री एकमुखी दत्तमंदिरासह शहरातील मंदिरात बुधवारी (ता. ७) सायंकाळी दत्त जन्मोत्सव सोहळा रंगणार आहे. सोहळ्यानिमित्त महाआरतीसह पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यानिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर चोवीस तास खुले राहणार आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. ६) मंदिरात मूर्ती आगमन सोहळा रंगला. शहराच्या विविध परिसरातील श्रीदत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गंगाघाटावरील अहिल्यादेवी होळकर पुलाजवळ नदीच्या उजव्या तटावर प्राचीन एकमुखी दत्तमंदिर असून, बर्वे कुटुंबीय चौथी पिढी या ठिकाणी कार्यरत आहे. देवस्थानतर्फे जन्मोत्सव महोत्सवानिमित्त 30 नोव्हेंबरपासून श्रीदत्त सप्ताहात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी आठ ते बारादरम्यान गुरुचरित्र व नवनाथ पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय रोज सायंकाळी ७ ते ९ यावेळेत पुणे येथील उदय घायाळ यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजता श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा पार पडेल, जन्मोत्सवासाठी भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर चोवीस तास खुले राहणार असल्याची माहिती मुख्य पुजारी मयूर बर्वे यांनी दिली. श्रीदत्त जन्मोत्सव सप्ताहानिमित्त देवस्थानतर्फे अन्नछत्र (महाप्रसाद) व्यवस्था करण्यात आली असून, सोमवारी (ता. १२) दुपारी साडेबारा वाजता व रात्री साडेआठ वाजता महाप्रसादाचे वाटप होईल.
उद्या पालखी सोहळा
गुरुवारी (ता. ८) रात्री नऊ वाजता महाआरती व पालखी सोहळा रंगेल. शुक्रवारी (ता. ९) सकाळी साडेनऊ वाजता विश्वकल्याणार्थ श्री दत्त यागाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचे हे पंधरावे वर्ष आहे. मंगळवारी (ता. १३) महापूजा व गोपाल काल्याने महोत्सवाची सांगता होईल.