
Last Updated on November 28, 2022 by Taluka Post
म्हसरूळ, त्र्यंबकेश्वरच्या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी
नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ आणि त्र्यंबकेश्वर रोडवरील आश्रमात घडलेल्या दोन्ही घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. त्यामुळे नाशिकसह राज्यातील सर्व आधार आश्रमांचे ऑडिट झालेच पाहिजे. किती आधार आश्रम नोंदणीकृत आहेत? किती बेकायदेशीररीत्या चालवले जात आहेत, असे सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहेत. त्यामुळे नाशिकच्या घटनेनंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे.
नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप गुरुकुल या आश्रमात संस्थाचालकाने शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, तर काही दिवसांपूर्वी नाशिक-त्र्यंबक रोडवरील आधारतीर्थ आश्रमात एका लहानग्यांचा खून करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दोन्ही घटनांमधील संशयितांविरोधात ठोस कारवाई करून आश्रमाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनेक पक्ष, संघटनांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आधारतीर्थ आश्रमातील गलथान कारभारावर ताशेरे ओढले आहेत. वाघ म्हणाल्या की, नाशिक शहरातील सुरू असलेल्या आश्रमांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी ज्या आधार आश्रमांनी शासनाची योग्य अशी परवानगी घेतली नसेल, ते बंद करण्यात यावेत, त्याचबरोबर राज्यातील सर्व आधार आश्रमांचे ऑडिट व्हावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली, तसेच या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही वाघ यांनी सांगितले.
नाशिकच्या आधार आश्रमांची तपासणी
दरम्यान, नाशिक शहर आणि त्र्यंबक रोडवरील आधारतीर्थ आश्रमातील दोन्ही घटना मन सुन्न करणाऱ्या असून, याबाबत आता ठोस पावले उचलण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे अनेक आश्रम अस्तित्वात आहेत आता सगळया आश्रमांची तपासणी केली जाईल . या सर्व आश्रमाची पोलखोल करण्याची गरज असल्याचे या घटनांवरून दिसून येते. अनेकदा मुलांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे, टॉर्चर करणे आदी प्रकार अशा आश्रमांत सर्रास होतात. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येते. अशाच पद्धतीने आश्रम चालकांचे फावते. त्र्यंबक, म्हसरूळसारख्या घटना घडतात. मात्र, यावर आता अंकुश लागणे आवश्यक असल्याचे मत • चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.
Comments are closed.