
Last Updated on November 29, 2022 by Jyoti S.
पोलिसांचा बंदोबस्त
शहरासह जिल्हाभरातील हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग घेतल्याने मोर्चेकरी आक्रमक होते. त्यामुळे मोर्चा मार्गावरील बहुतांश दुकाने मोर्चा मार्गस्थ होताना बंद करण्यात आली होती. शहर पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. नंतर त्यानुसार भालेकर मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वत्र पोलीस पथक मोर्चाबरोबरच मार्गक्रमण करीत होता.

समान नागरी कायद्यासाठी नाशकात हिंदू संघटनांची एकजूट
नाशिक : ‘हिंदुस्थान जिहादमुक्त झालाच पाहिजे, देशात धर्मांतर बंदी आणि समान नागरी कायदा झालाच पाहिजे, यांसह श्रद्धा वालकर हिचा मारेकरी आफताब यास फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’, अशा घोषणा देत सकल हिंदू संघटनांनी देशात होणाऱ्या लव्ह जिहाद प्रकरणांचा निषेध करण्यासाठी शहरातून मूक मोर्चा काढला. यावेळी निघालेल्या मोर्चात हिंदू मुलींना फसवून धर्मांतर केल्याप्रकरणी कठोर कायदा झाला पाहिजे, अशा आशयाचे फलक महिला व पुरुष मोर्चेकऱ्यांनी हाती घेतले होते. हिंदू भगिनींवरील लव्ह जिहाद, तसेच धर्मसंकट रोखण्यासाठी सकल हिंदू संघटनांच्या वतीने नाशिक – शहरातून विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात डोक्यावर भगवी टोपी, खांद्यावर भगवे उपरणे, हाती मागण्यांचा फलक आणि वंदे मातरम्, भारत माता की जय, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा घोषणा देणाऱ्या हिंदू बांधवांनी बी. डी. भालेकर मैदानापासून मोर्चास सुरुवात केली. सकाळी 11 वाजता सर्व मोर्चेकरी मैदानावर गोळा झाल्यानंतर तेथे मोर्चाचा मार्ग आणि घोषणा न देण्याच्या सूचना करण्यात आल्या.हा मोर्चा बी. डी. भालेकर मैदान, शालिमार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोड, सावाना, , मेन रोड, रविवार कारंजा, टिळकपथ, महात्मा गांधी मार्ग ते जुना आग्रा रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हा मोर्चा थांबला.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येताच तेथे सभा घेण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील नेहा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, हिंदू मुलींना प्रेमात पाडून त्यांचे बळजबरी धर्मांतर केले जात आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली धर्मांतर होत असून, प्रेमाचे केवळ नाटक केले जात आहे. सच्चे प्रेम केले तर मुलींच्या अशा हत्या होत नाही. यामागे मोठे षड्यंत्र असून, हिंदू धर्मीयांनी हा कावा वेळीच ओळखावा. संभाजी राजांनी हिंदू धर्मासाठी मरण पत्करले. अशा संभाजी राजांपासून प्रेरणा घेऊन सर्वांनी हिंदू धर्मासाठी एक व्हायला हवे. लव्ह जिहादचा हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू असून, शासनही त्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. हिंदू मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात फसविण्याचे प्रकार सुरू आहे. केवळ मुलींच नव्हे, तर हिंदू मुलांनाही लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवले जात आहे.

या सर्व धर्मविरोधी कारवाया थांबविण्यासाठी शासन व प्रशासनाने लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी कायदा देशभरात लागू करावा आणि श्रद्धा वालकर या हिंदू भगिनीचा मारेकरी आफताब यास फाशी देण्यात यावी. गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, त्याचप्रमाणे सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत श्रीशिवछत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, संघटना आणि राजकीय पक्षांवर कठोर कारवाई करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
ॲड. नेहा पाटील यांच्या भाषणानंतर सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार केला. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. यावेळी ध्येयमंत्राचे पठण करण्यात आले. मृत श्रद्धा वालकरला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर गायत्री धनगर, वैशाली फडोळ, वैशाली कातकाडे, अर्चना कदम आदी निवडक महिलांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना हिंदू संघटनांतर्फे मागणीचे निवेदन सादर केले. या मोर्चात सकल हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह आ. देवयानी फरांदे, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, महंत सुधीर पुजारी, महंत अनिकेत शास्त्री देशपांडे, प्रथमेश गिते, विनायक पांडे, वत्सला खैरे आदींसह विविध राजकीय पक्षाचे नेते, हिंदू संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षणचित्रे
● लव्ह जिहादविरोधी निघालेल्या मोर्चात जवळपास 30 हजार हिंदू बांधव उपस्थित होते.
●बहुसंख्य मोर्चेकऱ्यांनी डोक्यावर भगवी टोपी व खांद्यावर भगवे उपरणे परिधान केले होते.
● मोर्चाचे स्वरूप मूक असूनही अनेकांनी मोर्चादरम्यान घोषणा दिल्या.
●अनेकांनी शंखनाद करीत लव्ह जिहादविरोधात लढ्याचा पुकारा दिला.
●मोर्चातील महिलांची संख्या लक्षणीय होती, त्यांनी भगवी साडी परिधान केली होती.
●अनेक तरुणींनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हाती घेतला होता.
●मोर्चात अनेकांच्या हाती विविध मागण्यांचे फलक व भगवा झेंडा होता.
●महात्मा गांधी मार्गावर काहींनी दुकानांवर बाटल्या फेकण्याच्याही घटना घडल्या.
● शिस्तबद्ध झालेल्या या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.