Last Updated on December 16, 2022 by Jyoti S.
Gram Panchayat Election:सरकारचा हा मोठा निर्णय
महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारण सध्या ढवळून निघालं आहे. राज्यातील 7682 ग्रामपंचायतींसाठी(Gram Panchayat Election) येत्या रविवारी (ता. 18 डिसेंबर) मतदान होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावं, यासाठी राज्य सरकारने या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी या निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केलं आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने आदेश जारी केले आहेत. त्यात 18 डिसेंबरला ज्या खासगी आस्थापनांना आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देणं शक्य नसेल, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान 2 तासांची सवलत द्यावी. मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सवलत न देणाऱ्या दुकाने, कार्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा आदेशात दिला आहे.
(Gram Panchayat Election)आदेशात नेमकं काय..?
– निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या कामगार/अधिकारी/कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी.
– उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकानांनाही हा आदेश लागू राहिल. (खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादींचा समावेश असेल .)
– कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसल्यास कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.Hydrogen : खुशखबर!!!राज्यात येणार हायड्रोजन वाहने
– कोणत्याही परिस्थितीत मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घ्यावी.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकान मालकांनी/व्यवस्थापनाने आदेशाचे पालन करावे. मतदानाकरिता सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न आल्यास, याबाबतची तक्रार आल्यास, कारवाई करण्यात येईल.