
Last Updated on November 28, 2022 by Jyoti S.
श्वानासोबत मस्ती अन् दिव्यांग व्यक्तीची व्हीलचेअरही ढकलली
इंदौर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ रविवारी मध्य प्रदेशमधील सर्वात मोठे शहर इंदौरमध्ये दाखल झाली. सकाळी यात्रा सुरू झाल्यानंतर राहुल गांधी यांनी बुलेट चालवण्याचा आनंद घेत बुलेट चालकाच्या जर्मन शेफर्ड प्रजातीच्या श्वानासोबत थोडीशी मस्तीही केली, तर यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेल्या एका दिव्यांग व्यक्तीची व्हीलचेअरदेखील राहुल गांधी काही वेळ ढकलताना दिसून आले.
भारत जोड़ो यात्रे’च्या मध्य प्रदेशातील पाचव्या दिवशीदेखील लोक मोठ्या उत्साहाने यात्रेत सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव महूमध्ये रात्री विश्रांती घेतल्यानंतर सकाळी यात्रेला सुरुवात झाली. उपनगरीय भागातून इंदौरमध्ये प्रवेश केल्यानंतर दिव्यांग मनोहर यांनी व्हीलचेअरसोबत यात्रेत भाग घेतला. राहुल गांधी यांनी स्वतः काही वेळ मनोहर यांची व्हीलचेअर ढकलत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मनोहर यांनी आता खऱ्या अर्थाने देश बदलण्याची अपेक्षा राहुल गांधींकडे व्यक्त केली. याशिवाय राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान बुलेट चालवण्याचादेखील आनंद घेतला. बुलेटमालक व व्यवसायाने अभियंता असलेले रजत यांनी नुकताच आपल्या नोकरीला रामराम ठोकला आहे.
मागच्या पाच दिवसांपासून ते आपल्या बुलेटद्वारे यात्रेच्या मागेमागे चालत होते. या प्रवासात त्यांच्यासोबत ‘माऊल’ नामक जर्मन शेफर्डदेखील आहे. रजत यांनी राहुल यांची भेट घेत बुलेट चालवण्याचा आग्रह केला. यानंतर राहुल यांनीही विनंतीला मान देत हेल्मेट घालून काही वेळ बुलेट चालवली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे धावताना दिसून आले, तसेच राहुल गांधी यांनी रजत यांच्या श्वानासोबतदेखील काही क्षण घालवले. रजत यांनी प्राण्यांसाठी मध्य प्रदेशात चांगले रुग्णालय नसल्याची बाब राहुल यांच्या कानावर घातली. दरम्यान, जुन्या इंदौरमधील मिठाईच्या दुकानात 17 नोव्हेंबर रोजी टपालाद्वारे एक पत्र आले होते. यात 1984 च्या शीखविरोधी दंगलीचा उल्लेख करत ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान इंदौरच्या वेगवेगळ्या शहरांत बॉम्बस्फोट करत राहुल गांधी व कमलनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख केली असून, या प्रकरणी एक व्यक्तीला अटकसुद्धा करण्यात आली होती.