
Last Updated on December 2, 2022 by Jyoti S.
उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन : ‘लहू’ शक्तीलाही साद
मुंबई : शिवशक्ती-भीमशक्ती आणि लहूशक्ती ही एकाच शक्तीची विविध रूपे आहेत. फक्त निवडणुकीत महत्त्वाची असते. लढाईच्या वेळेस ढीगभर गद्दारांपेक्षा मूठभर मर्द सोबत असणेच गरजेचे असते, असे प्रतिपादन शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी वांद्रे येथे केले. वस्ताद लहूजी साळवे जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
उपस्थितांना उद्देशून ते म्हणाले, मुंबईत तुमची संख्या तीन-साडेतीन लाखांच्या आसपास असेल. पण ही संख्या आज कमी नाही. शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहूशक्ती एक झाली, तर अशी आणखी बरीच ताकद आपल्याबरोबर येईल. निवडणुकीत ती महत्त्वाची ठरेल. आज वेळ लढाईची आहे. लढाईच्या वेळेस ढीगभर गद्दार सोबत असण्यापेक्षा मूठभर मर्द आवश्यक असतात. आपली ताकद एक झाली तर महाराष्ट्रातच काय, संपूर्ण देशात ती भारी पडेल. अंधकार जाळणारी मशाल आपल्या हाती आहे. ती आपण किती ताकदीने वापरतो तेच महत्त्वाचे आहे. मी हळूहळू बाहेर पडतो आहे. आपले सरकार असताना दोन वर्षे कोरोनात गेली. नंतर माझी शस्त्रक्रिया झाल्याने सहा महिने त्यात गेले. त्यावेळी मला घराबाहेर पडता येत नव्हते. मी घराबाहेर पडत नसल्याने ‘हा घराबाहेर पडत का नाही, अशी टीका त्यावेळी ज्यांनी केली, त्यांच्याच पोटात आता मी घराबाहेर पडू लागल्याने गोळे येऊ लागले आहेत,’ अशी टीका करून ते म्हणाले, आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे. मुख्यमंत्रीपदी आपली व्यक्ती असेल. महिला असो की पुरुष; मुख्यमंत्री आपलाच असेल.
महिला मुख्यमंत्री?
महिला असो की पुरुष; मुख्यमंत्री आपलाच असेल’ ठाकरे यांनी जाणीवपूर्वक केलेल्या या विधानाने ठाकरे यांच्या मनात नेमके काय आहे? याबाबतच्या तर्कवितर्कांना राजकीय वर्तुळात उधाण आले. शिवसेनेत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे अनुभवी असल्या तरी ठाण्यातील टेंभी नाक्याच्या दौऱ्यानंतर रश्मी ठाकरेही पक्षात सक्रिय झाल्या आहेत. महाविकास आघाडीचा विचार केला, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदासाठी आधीपासूनच चर्चेत आहेत.आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
Comments are closed.