Last Updated on January 7, 2023 by Taluka Post
?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
Manikrao Kokate Offers: माणिकराव कोकाटे यांना शिंदे-भाजपकडून ऑफर्स
नाशिक(Manikrao Kokate Offers) : राज्यातील सध्याचे सरकार चाचपडते आहे. पूर्ण क्षमतेने मंत्रिमंडळ कार्यरत नाही. पहिली अडीच वर्षे कोरोनामुळे गेली. आता सरकार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या आमदारकीच्या टर्मबाबत मी समाधानी नाही. या मनःस्थितीपर्यंत मी आलो आहे. मला शिंदे गटासह भाजपाकडूनही ऑफर्स आहेत परंतु आता पुन्हा पक्ष बदलायचा नाही, असा निश्चय केल्याचे सिन्नर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
कोकाटे म्हणाले आगामी लोकसभा की विधानसभा निवडणूक लढवायची याबाबत निश्चित असा विचार केलेला नाही परंतु लढायचेच ठरवले तर विधानसभेला प्राधान्य असेल. लोकसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. लोकसभेला जर वरिष्ठपातळीवर जागा अदलाबदलबाबत निर्णय झाला तर कदाचित जि. प. सदस्य सीमंतिनी कोकाटे या लोकसभा लढवू शकतात. मी आजवर अनेक पक्ष बदलले परंतु एकाच पक्षात कायम राहिलो असतो तर मी मंत्रिपदापर्यंत पोहोचलो असतो.
आता मात्र राष्ट्रवादीतच राहणार असून पक्ष बदलाचा अजिबातच विचार नसल्याचेही कोकाटे यांनी स्पष्ट केले. राज्यातील शिंदे गट भाजपाच्या सरकारबद्दलही त्यांनी सडेतोड भूमिका मांडली. धर्माची अफूची गोळी देत लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. राज्यात सत्ता बदलाचा त्यांचा गेम फसला आहे. या सरकारवर न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार आहे.
राज्यात राष्ट्रवादीची होणारी आगेकूच पाहून धसका घेतलेल्या भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना टार्गेट केले असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. दरम्यान, आपल्या सिन्नर मतदारसंघात अनेक विकासाची कामे झाले असून विजेचा प्रश्नही येत्या काही महिन्यांत मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बंधूच्या राजकीय विरोधाचा परिणाम नाही
घरातूनच होत असलेल्या विरोधाबाबत कोकाटे, म्हणाले, माझे बंधू भारत कोकाटे यांनाही त्यांचे अस्तित्व दाखवायचे असेल. आमच्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मी स्वकष्टाने ती उभी केली आहे. मी लोकांसाठी धावतो म्हणून लोक माझ्यावर प्रेम करतात. बंधूच्या राजकीय विरोधाचा माझ्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. असेही कोकाटे यांनी सांगितले.