
Last Updated on December 24, 2022 by Taluka Post
Sinner Cold: सिन्नर थंडीने गारठले ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
सिन्नर(Sinner Cold) / निन्हाळे : ऐन हिवाळ्यात गायब झालेली थंडी आता पुन्हा अवतरली आहे. या थंडीचा आता कडाका अचानक वाढल्याने सर्वांना हुडहुडी भरली आहे. घरात अडगळीत पडलेले उबदार कपडे बाहेर निघाले आहेत. तसेच थंडीअभावी पिवळे पडत •असलेला गहू, हरभऱ्याचे पीक थंडीच्या कडाक्याने बहरल्याचे चित्र असून, रब्बी पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. थंडीचे जोरदार आगमन झाल्याने हिवाळा जाणवू लागला आहे.
अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामध्ये डिसेंबर महिना अर्धा महिना संपला. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवडे फारशी थंडी नव्हती. मात्र, या आठवड्यात सोमवारपासून थंडीमध्ये वाढ झाली आहे. पहाटेच्या वेळी थंडीचा चांगलाच कडाका वाढला आहे. हवामान खात्याने ही या आठवड्यात थंडी वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. थंडी वाढल्याने उबदार कपड्यांनाही मागणी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी हिवाळा सुरू झाला असताना हिवाळा आहे की नाही, असेच वातावरण होते. कारण थंडी पडलीच नाही. उलट पाऊस आणि गरमीचे वातावरण होते. अधूनमधून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हिवाळा ऋतू आहे की काय असे झाले. यावर्षी परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रब्बी हंगामातील गहू हरभरा पिके थंडी अभावी पिवळी पडत होती. थंडीचा कडाका वाढल्याने सर्वांना हुडहुडी भरली आहे.
जागोजागी पेटू लागल्या शेकोट्या
हिवाळ्यामध्ये गहू हरभरा व अन्य पिकांवर थंडीचा जसा परिणाम होतो, तसा बाजारावरही होतो. हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. ऋतुचक्र व्यवस्थित फिरले तर अर्थचक्र व्यवस्थित फिरते. यादरम्यान वाढलेल्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटत आहेत. उन्हात उभे राहून थंडी कशी गायब झाली होती आणि कशी आली, अशा गप्पांचे फडही रंगत आहेत. बाजारात उबदार कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढल्याने हिवाळ्याचा हंगाम परत आल्यासारखे वातावरण आहे.
थंडीमुळे रात्री रस्त्यावर होणारी गर्दी विरळ झाली आहे. शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करीत आहेत. अधूनमधून पहाटेच्या वेळी धुके पडत असल्याचे चित्र आहे.
Comments are closed.