भिवंडीत सापडला ६ वर्षांपूर्वी हरवेलला मुलगा

Last Updated on November 21, 2022 by Taluka Post

भिवंडी : भिवंडी परिसरातील एक दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा यात्रेसाठी उत्तर प्रदेश गेले होते. या वेळी त्यांचा मुलगा आई-वडिलांचा हात सुटल्याने यात्रेच्या गर्दीत हरवला, त्यानंतर त्याला शोधण्यासाठी अथक प्रयत्न आई-वडिलांनी केले, मात्र त्यांना अपयश आल्याने ते हतबल होऊन भिवंडीत परतले. परंतु त्यांना मुलाची चिंता सतत हेलावून टाकत होती. अखेर तब्बल ६ वर्षांनी त्या मुलाला बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी आई-वडिलांकडे भिवंडीत सुखरूप आणून परत केले. त्यामुळे दाम्पत्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. सहा वर्षांनी मुलाला सुखरूप डोळ्यासमोर पाहून त्यांचे हृदय गहिवरले होते.

भिवंडीतील रिजवान कुरेशी (१७) हा त्याच्या कुटुंबासह २०१६ मध्ये उत्तर प्रदेशमधील बहराईच येथे भिवंडीतील रिजवान कुरेशी गाजीबाबा जत्रेत गेला होता. तिथे तो आई-वडिलांचा हात सुटून हरवला होता. त्या वेळी तो ११ वर्षांचा होता तसेच तो गतिमंद असल्याचे त्याच्या परिवाराने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, रिजवान कुटुंबापासून दूर झाल्यानंतर तो रेल्वेने गुजरातमधील अहमदाबादमध्ये पोहोचला, तेथे त्यास एका व्यक्तीने माणुसकीच्या नात्याने कुटुंबाविषयी विचारले, मात्र रिजवान उत्तर देण्यास असमर्थ ठरल्याने त्या व्यक्तीने रिजवानला अहमदाबाद येथील एका हॉटेलमध्ये कामावर ठेवले.

बोरिवली लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

दरम्यान, रिजवानने त्या ठिकाणी तीन ते चार वर्षे काम केले. त्यानंतर लॉकडाऊन काळात रिजवान रेल्वेत बसून मुंबईच्या दिशेने निघाला होता. बोरिवली स्टेशन अंतर्गत रेल्वेतून पड्न जखमी झाला. त्यास बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी घरचा पत्ता विचारला असता, त्यावेळीही तो उत्तर देऊ शकला नाही, त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी त्याच्यावर उपचार करून त्याची माटुंगा चाईल्ड केअर सेंटरमध्ये रवानगी केली होती. मात्र, लोहमार्ग पोलीस हर्षाली बानपट्टे यांच्या • नेतृत्वाखाली पथकाने रिजवानच्या न घराची शोधमोहीम सुरू ठेवली होती.

लोहमार्ग पोलीस पथकाचे नालासोपारा आणि गोवंडीत शोधकार्य सुरूच होते. दरम्यान, रिजवानने भिवंडी आणि मंडप डेकोरेशनचे नाव घेतल्याने • लोहमार्ग पोलीस पथकाच्या हर्षाली बानपट्टे यांनी तपासाची सूत्रे भिवंडीकडे वळवली. त्यांनी भिवंडीत मंडप डेकोरेशनचे काम करणाऱ्या लोकांची माहिती काढण्यास सुरुवात केली, त्या वेळी त्यांना म्हाडा कॉलनीत राहणारे मोहम्मद आयुब कुरेशी यांचा मुलगा काही वर्षांपासून बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी पोलीस पथकासह मोहम्मद कुरेशी यांचे घर गाठले. आणि त्यांच्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार कथित करून रिजवान विषयी सांगितले. तसेच रिजवानची काही जुनी छायाचित्र आई-वडिलांना दाखवली, छायाचित्रे बघताच आई-वडिलांना त्याची ओळख पटल्याने त्यांनी धाव घेत माटुंग्याचे चाईल्ड केअर सेंटर गाठले तिथे रिजवानचा शोध घेत असताना रिजवानने त्यांना पाहिल्याने तो आई-वडिलांना मिठी मारून ढसाढसा रडला.