ऑर्डर केला स्मार्टफोन मिळाला वायर कटर

Last Updated on November 21, 2022 by Taluka Post

वॉशिंग्टन :सध्या जगभरात ऑनलाइन शॉपिंगचे चलन वाढले आहे. घरबसल्या स्मार्टफोनवरून आपल्या हवी ती गोष्ट ऑनलाइन मार्केटिंग वेबसाईटवरून मागवता येते. पण ही ऑनलाइन होम डिलिव्हरी कधी कधी डोकेदुखी ठरते. आपण ऑर्डर करतो एक वस्तू आणि आपल्या घरी पोहोचवली जाते भलतीच वस्तू. अशाप्रकारचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. असाच किस्सा आहे ब्रिटनमधील एका महिलेचा. या महिलेने ॲमेझॉन या ऑनलाइन मार्केटिंग वेबसाईटवरून ६१ हजार रुपयांचा स्मार्टफोन ऑर्डर केला होता. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या घरी डिलिव्हर करण्यात आलेला बॉक्स त्यांनी उघडून पाहिला तेव्हा त्यात असलेली वस्तू पाहून त्यांना हसावे की रडावे हेच कळेना. कारण बॉक्समध्ये महागड्या स्मार्टफोनच्या जागी त्यांना पन्नास-शंभर रुपये किमतीचे वायर कटर होते

क्लेयर विल्सन असे या ३४ वर्षीय महिलेचे नाव आहे. गेल्या महिन्यात १२ ऑक्टोबर रोजी तिने ॲमेझॉनवर ‘वन प्लस’चा स्मार्टफोन ऑर्डर केला होता. मात्र, स्मार्टफोनऐवजी वायर कटर पाहिले तेव्हा त्या संतापल्या. त्यांनी कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना असे सांगण्यात आले की, डिलिव्हरी करण्यात आलेल्या बॉक्सवर ‘रिटर्न’ असे लेबल लावून कंपनीकडे परत पाठवल्यास त्यांचे पैसे परत केले जातील. क्लेयर यांनी त्यांच्या सांगण्यानुसार तो बॉक्स जशास तसा पुन्हा पॅक करून रिटर्न लेबलसह कंपनीकडे पाठवला. दहा दिवस उलटून गेल्यावर कंपनीकडून क्लेयर यांना एक फोन कॉल आला त्यांना सांगण्यात आले की,

त्यांनी अद्याप स्मार्टफोन परत केलेला नाही. ते ऐकून क्लेयर यांचा पारा अधिकच चढला. त्यांनी ॲमेझॉनकडून आपल्याला आलेला हा वाईट अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यावर युझर्सच्या प्रतिक्रिया येऊ लागताच ॲमेझॉनच्या व्यवस्थापनाला खडबडून जाग आली. त्यांनी क्लेयर यांची माफी मागून त्यांना त्यांचे पैसे परत दिले. हेही वाचा: ऐतिहासिक करारावर ‘सीओपी-२७’मध्ये शिक्कामोर्तब, भारताकडून स्वागत